नेवासा नगरपंचायतीचा कारभार खोळंबला: चुकीच्या सर्वेक्षणामुळे नागरिकांवर अन्यायाची टांगती तलवार
नेवासा शहरातील कर वसुली संदर्भात नगरपंचायतीने नियुक्त केलेल्या सारा IT एजन्सीने केलेले सर्वेक्षण वादग्रस्त ठरले आहे. सदर एजन्सीने शहरातील इमारतींचे सर्वेक्षण करताना प्लॉट क्षेत्रफळ आणि बांधकाम क्षेत्रफळ यामध्ये प्रचंड गोंधळ केल्याचे उघड झाले आहे. या सर्वेक्षणात तांत्रिक निकषांचे पालन न करता घाईघाईने आणि अननुभवी कर्मचाऱ्यांकडून काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या हलगर्जीपणामुळे अनेक नागरिकांच्या मालमत्तेची करपात्र रक्कम अनेक पटींनी वाढली आहे. परिणामी, या चुकीच्या सर्वेक्षणाचा मोठा बोजा नेवासा शहरवासीयांवर कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर इंजिनीयर सुनीलराव वाघ, भाजपा शहराध्यक्ष रोहित पवार, माजी सरपंच सतीश गायके, शिवसेना शहराध्यक्ष बंडू शिंदे, भाजपा मीडिया प्रमुख आदिनाथ पटारे, संतोष चांदणे, विकी सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीला धडक देत आक्रमक भूमिका घेतली.
यावेळी या नेत्यांनी ठाम भूमिका घेत चेतावणी दिली की, “जोपर्यंत मालमत्तेची योग्य ती करपात्र रक्कम निश्चित होत नाही, तोपर्यंत संबंधित एजन्सीला कोणतेही पेमेंट देऊ नये. तसेच फेरसर्वेक्षण होईपर्यंत हा विषय थांबवावा, अन्यथा नेवासा नगरवासीय रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील.”
या प्रकारामुळे नेवासा नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता नगरपंचायत या प्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.