दिवसा घरफोडी करणारे दोन आरोपी जेरबंद – १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
खरवंडी, ता. नेवासा: येथील एका घरफोडीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केलेल्या कारवाईत दोन आरोपींना अटक करत १,२९,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
ही घटना दि. ५ मार्च २०२५ रोजी घडली. फिर्यादी योगेश सुरेश भोगे (रा. खरवंडी, ता. नेवासा) यांच्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, अशोक लिपणे, सोमनाथ झांबरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, फुरकान शेख, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे आणि महादेव भांड यांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान गुन्हा रोहित नादर चव्हाण (वय २७, रा. चिचोंडी पाटील, ता. अहिल्यानगर) व त्याचा साथीदार करण सिरसाठ भोसले (वय २८, रा. ढोरेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने दौलावडगाव (ता. आष्टी, जि. बीड) येथील एका सोनाराला विकल्याची माहिती दिली.
पोलिसांनी संबंधित सोनाराकडून १.२९ लाख रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.