🚍 *नगर जिल्ह्यातील दोन कोटी वृद्धांचा एसटीतून मोफत प्रवास*
देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील वयोवृद्धांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास योजना शासनाने सुरू केली आहे. नगर जिल्ह्यातील सुमारे २ कोटी ज्येष्ठ नागरिकांना आत्तापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र व केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करता येणार आहे. याचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.