20 हजाराची लाच घेताना तहसीलदारासह कोतवालावर गुन्हा दाखल

केज तहसील कार्यालयातील पुरवठा विभागांतर्गत आरोप असलेल्या एका धान्य दुकानावरची कारवाई टाळण्यासाठी कोतवालामार्फत 40 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करणार्‍या केज येथील तहसीलदारासह कोतवालावर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित कोतवालाने 20 हजार रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. तहसीलदार मात्र फरार झाला आहे.बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसात तीन अधिकार्‍यांवर लाच घेताना थेट कारवाई करण्यात आली. लाच दिल्याशिवाय कोणतेच काम होत नसल्याची गंभीर परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे. लाच प्रकरणी ज्या अधिकार्‍यांना पकडण्यात आले त्यांच्याजवळ मोठे घबाडही सापडले आहे. अशीच एक घटना केज तहसील कार्यालयामध्ये घडली. धान्य दुकानदाराने ग्राहकांना वाटप केलेल्या धान्यामध्ये तफावत असल्याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली होती. त्याविरोधात कारवाई न व्हावी यासाठी तहसीलदार अभिजित जगताप यांनी कोतवाल मच्छिंद्र माने यांच्या माध्यमातून 40 हजार रुपयाची धान्य दुकानदाराकडे मागणी केली. तडजोडीअंती 20 हजार रूपयाची लाच ठरली. याबाबत धान्य दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला कळवले होते. त्यानुसार कोतवाल मच्छिंद्र माने यास लाच घेताना रंगेहात जेरबंद करण्यात आले. मात्र तहसीलदार अभिजित जगताप फरार झाला आहे. या प्रकरणी बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिवचे पोलीस उपाधिक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी हा सापळा रचला. यात पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे या पथकाचा सहभाग होता.



        
        
        
        
            
                        
            

                                                    

    
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.