समर्पण फाउंडेशनचे डॉ. घुले यांचा आंदोलनाचा इशारा, बेकायदेशीरित्या होत आहे तपासणी कामगारांच्या रक्ताचे नमुने घेणे त्वरित थांबवा
प्रतिनिधी | नेवासे
नेवासे तालुक्यामध्ये तपासणीच्या नावाखाली नोंदीत बांधकाम
कामगारांचे बेकायदेशीर पद्धतीने रक्ताचे नमुने गोळा करण्याची मोहीम हिंद लॅब कंपनीने सुरू केली आहे.कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.याबाबत बांधकाम कामगार मंडळाचे आयुक्त यांनी तातडीने कारवाई करून या कंपनीस काळ्या यादीत टाकण्याची मागणी समर्पण मजदूर
संघाचे डॉ. करणसिंह घुले यांनीकेली.नोंदीत बांधकाम मजुरांसाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने आरोग्य तपासणी व उपचार योजना आणली आहे. या
योजनेअंतर्गत नोंदीत बांधकाम मजूर व त्याच्या कुटुंबातील सदस्य यांची तज्ञ डॉक्टरांनी जागेवर येऊन
तपासणी करणे आवश्यक आहे.तपासणीअंती जे आजार तज्ञ
डॉक्टरांना निष्पन्न होतील, त्या अनुषंगाने त्याच्या रक्ताच्या व इतर सोनोग्राफी एक्सरे वगैरे तपासण्या करून निदान निश्चिती करणे गरजेचे आहे. त्यानंतर रुग्णाला मंडळाने निश्चित करून दिलेल्या रुग्णालयात दाखल करून त्याचा पूर्ण उपचार करून घेणे व त्यानंतर त्याला सुखरूप रुग्णवाहिकेत घरी पोहोचवणे गरजेचे आहे. तपासणी करताना व रक्त नमुने गोळा करताना
तज्ञ डॉक्टर व स्त्री मदतनीस सोबत असणे बंधनकारक आहे. हे सर्व नियम व कार्यप्रणाली धाब्यावर ठेवून या संबंधित कंपनीकडून सध्या नेवासे तालुक्यात नवशिक्या अकुशल मुलांना कामगाराच्या घरी पाठवले जाते. ते रक्ताचे नमुने गोळा
करतात. हे नमुने गोळा करताना कामगाराला रक्त देणे गरजेचे आहे,अन्यथा योजना बंद होतील, अशी धमकी दिली जाते. आम्ही जिल्ह्याचे ठिकाणहून आलो आहोत आम्हाला
अर्जंट जायचे आहे, असे सांगत कामगाराला व त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या हातातले काम सोडून रक्त देण्याची घाई करतात. रक्त घेताना व त्यानंतर घेण्याची खबरदारी व
काळजी या लोकांकडून घेतली जात नाही. अशा पद्धतीने सरकारी योजनेला हरताळ फासला जात आहे. समर्पण मजदूर संघाने ई-मेलद्वारे विभागीय आयुक्त व
सहाय्यक कामगार आयुक्त अहमदनगर यांना पत्र व्यवहार
करून ही योजना तातडीने बंद करून नियमानुसार व कार्यप्रणालीनुसार आरोग्य तपासणी व उपचार व्हावेत,
अशी मागणी केली. या कंपनीला काळ्या यादीत टाकून यांचे काम बंद करावे, अन्यथा पुढील आठवड्यापासून या योजने विरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा
डॉ. करणसिंह घुले यांनी दिला.कामगारांनी कोणाच्याही सांगण्यावरून अशा पद्धतीने रक्ताचे नमुने देऊ नयेत. कुणी तपासणी रक्त देण्यासाठी बळजबरी करत
असेल, तर समर्पण फाउंडेशनकडे संपर्क करावा, असे आवाहन डॉ.करण घुले यांनी केले.