अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करानेवासा आप ची मागणी : अधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निवेदन : उपोषणाचा इशारा

अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करा
नेवासा आप ची मागणी : अधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निवेदन : उपोषणाचा इशारा

नेवासा (प्रतिनिधी) - घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून तालुक्याच्या विविध भागांतील अनाधिकृत महाकाय होर्डिंग्जवर तातडीने कारवाई करण्यासह अधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आग्रही मागणी नेवासा आम् आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तालुका प्रशासनाने बोटचेपे धोरण अवलंबल्यास येत्या दि. 1 जून पासून नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा गर्भित इशाराही देण्यात आला आहे.

नेवासा आम आदमी पार्टीच्या वतीने नेवासा तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईच्या घाटकोपर भागात वादळी वाऱ्यासह नुकत्याच झालेल्या पावसाने जाहिरातीचे होर्डींग कोसळून अनेक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे राज्यभरातील अनाधिकृत होर्डींग्जसह अधिकृत होर्डींग्जच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर आल्याकडे याद्वारे संबंधितांचे लक्ष वेधण्यात आले आहे. 

गेल्या काही वर्षात नेवासा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रामुख्याने नगर - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गालगत तसेच तालुक्याच्या विविध भागांतून जाणाऱ्या राज्य महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर अवाढव्य लोखंडी होर्डींग्ज उभारून अनेकजण त्यामाध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत असल्याची बाब यात नमूद करण्यात आली आहे. मात्र बोटावर मोजण्याइतके होर्डींग्ज वगळले तर बहुतांश होर्डींग्ज हे सपशेल अनाधिकृत असल्याची धक्कादायक बाब आम् आदमी पार्टीच्या वतीने संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. अशा प्रकारे अनाधिकृत धोकादायक होर्डींग्ज उभारणाऱ्या व्यक्ती या धनदांडग्या तसेच मोठा राजकीय वकूब असलेल्या असल्यानेच प्रशासन त्यांच्या या बेकायदेशीर कृत्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आप ने या निवेदनात केल आहे. होर्डींग्ज उभारण्याबाबतचे नियम धाब्यावर बसवून रस्त्याच्या कडेला सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात न घेता उभारण्यात आल्याने वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यास संभाव्य दुर्घटनेतून मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्त हानी होण्याची भीती यात व्यक्त करण्यात आली आहे. बहुतांश होर्डींग्ज हे अनाधिकृत असल्याने त्याची कुठल्याही प्रकारची नोंद प्रशासनाकडे नसल्याची बाब यात अधोरेखित करून त्यानुषंगाने त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दाच उद्भवत नसल्याने भविष्यात काही दुर्घटना झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा खडा सवाल आप ने उपस्थित केला आहे. 

त्यामुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची वाट न पाहता संबंधित अनाधिकृत होर्डींग्ज तातडीने काढून टाकण्याची कार्यवाही करण्यासह मोजक्या असलेल्या अधिकृत होर्डींग्जचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी आप ने या निवेदनाद्वारे केली आहे. आगामी काळात या होर्डींग्जमुळे दुर्घटना घडून काही जीवित तसेच वित्तीय हानी झाल्यास त्यासाठी संपूर्णपणे प्रशासनास जबाबदार धरण्याचे यात स्पष्ट करून याबाबत प्रशासन उदासीन दिसून आल्यास येत्या दि. 1 जून पासून नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा आम् आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड. सादिक शिलेदार, सचिव प्रवीण तिरोडकर, शहराध्यक्ष संदीप आलवने, अल्पसंख्यांक आघाडीचे करीम सय्यद, युवक आघाडीचे सोमनाथ कचरे, तसेच सुमित पटारे, मुन्नाभाई आतार, भैरवनाथ भारस्कर, देवराम सरोदे, किरण भालेराव, अण्णा लोंढे, पोपटराव सोनवणे आदींनी दिला आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.