ईदुल फित्र म्हणजेच 'रमजान ईद'
आज जगभरामध्ये मुस्लिम बांधवांचा सर्वात
मोठा सण असलेली ईदुल फित्र अर्थात रमजान
ईद साजरी केली जात आहे. सर्वांना मनापासून
ईद मुबारक...
ईद म्हणजे खुशी, आनंद, ज्यांनी अत्यंत
कडक उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास सहन करून
केवळ अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी,
त्याच्या आदेशानुसार महिनाभराचे रोजे पूर्ण केले.
त्यांना ईद मुबारक. तरावीहची नमाज नियमितपणे
आदा केली. त्यांना ईद मुबारक. रमजान
महिन्याचे पालन करताना हजरत पैगंबरांनी प्रत्यक्ष
आचरणातून घालून दिलेल्या आदेशाप्रमाणे पूर्ण
महिना इबादत रोजा, नमाज, तिलावत यामध्ये
व्यतीत केला अशा सर्वांना ईद मुबारक. लहान
लहान बालकांनी सुद्धा अत्यंत श्रद्धेने रोजे केले.
त्यांनाही ईद मुबारक.
आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. मागील
दोन वर्ष कोरोनाच्या जागतिक संकटामुळे आपण
ईद साजरी करू शकलो नव्हतो. अल्लाहच्या कृपेने
गेल्या वर्षी ते संकट कमी झाले. सर्वांनी मनोभावे
प्रार्थना केली आणि म्हणून प्रथमतः त्या परम पवित्र
परमेश्वराचे आभार. ज्याने यावर्षी आपल्याला
ईद ची खुशी प्रदान केली. आजचा दिवस हा
मागचे सर्व काही विसरून नव्या आनंदाने, नव्या
जीवनाची सुरुवात करण्याचा दिवस आहे. झालेल्या
चुका माफ करून पुन्हा त्या न करण्याचा निश्चय
करण्याचा दिवस आहे. समाजातील सर्व घटकांना
सामावून घेऊन प्रत्येकाला आनंद कसा उपभोगता
येईल, यासाठी उपाययोजना करून सर्वांना आनंदात
सहभागी करून घेण्याचा हा दिवस आहे.
या महिन्यांमध्ये अनेक
ठिकाणी देशातील बंधुभाव
वाढवणाच्या घटना दृष्टीस
पडल्या. मंदिर आणि चर्चमध्ये
सुद्धा रोजा इफ्तारचे कार्यक्रम
पार पडले. त्यामध्ये सर्व
देशबांधव सहभागी झाले. सर्वांनी
आपली वैभवशाली परंपरा आणि इतिहासाचे
अवलोकन करत भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीने
गुण्यागोविंदाने राहून हा देश मजबूत करण्याचा
संकल्प केला.
आज ईदगाह आणि मशिदींमध्ये ईदची
नमाज अदा करताना जगातील समस्त मानव
जातीच्या कल्याणासाठी दुआ मागितली जाणार
आहे. सर्वांना मुबारकबाद देताना क्षीरखुर्माचा
आस्वाद घेतला जाणार आहे. हा आस्वाद घेताना
आपापसातील बंधुभाव आणि स्नेह वृद्धिंगत होणार
आहे. हाताची पाच बोटे सारखी नाहीत. त्यामुळे
सर्वांचे सुविचार एक सारखे नाहीत. परंतू आज
सर्व काही विसरून एकमेकांना अत्यंत प्रेमाने
दिलखुलासपणे आपण ईदच्या शुभेच्छा दिल्या
आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना ईद मुबारक!
रमजान महिन्याची सांगता
होताना अल्लाहची रहमत,
बरकत आपल्या सर्वावर
व आपल्या देशावर सतत
होत राहो हीच अल्लाहकडे
प्रार्थना मनापासून
आभार. यावर्षी ईद
च्या काळातच देशांमध्ये
लोकशाहीच्या रक्षणार्थ लोकसभेच्या निवडणुका
होत आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून देशातील
जनता आपले भावी सरकार, भावी लोकप्रतिनिधी
निवडणार आहेत. या देशाचा सर्वागीण विकास आणि
देशातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारे सरकार
भविष्य काळामध्ये या देशाला मिळावे, ही देखील या
निमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना.