लोकसभा निवडणूक नगरच्या महायुतीच्या मेळाव्याला आमदार निलेश लंकेंची अनुपस्थिती, विखेंच्या विरोधात लोकसभा लढवण्यावर ठाम? 

अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात जरी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत एकत्रित असले तरी स्थानिक पातळीवर मात्र महायुतीत कुरघोड्या आणि राजकारण सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. अहमदनगरच्या महायुतीच्या मेळाव्यातून असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. नगरच्या महायुतीच्या मेळाव्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची अनुपस्थिती चांगलीच चर्चेत राहिली. 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरामध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीच्या वतीने मेळावा घेण्यात आला. मात्र या मेळाव्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके अनुपस्थित राहिले. 
सुजय विखेंच्या विरोधात लोकसभा निवडणूक
भाजपचे खा. सुजय विखेंच्या विरोधात दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना महायुतीच्या नगरमध्ये होणाऱ्या मेळाव्याचे  निमंत्रण देण्यात आले.  त्यामुळे लंके महायुतीच्या व्यासपीठावर येणार की नाही? याबाबत चर्चेला उधाण आले होते. मात्र महायुतीच्या मेळाव्याला निलेश लंके उपस्थित राहिले नाहीत. 
भाजप खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे आणि तो आज स्पष्टपणे दिसून आला. खासदार विखे यांनी अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मतदारसंघात साखर-डाळ वाटप सुरू केले आहे. तर आमदार लंके यांनी देखील शिवस्वराज्य यात्रा सुरू करून लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
कारण माहिती नाही
आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी विखे यांचे नाव न घेता कुणी साखर वाटो किंवा डाळ, आम्ही लोकांच्या मनात आहोत असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे विखे आणि लंके यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला. दरम्यान, याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना लंके का उपस्थित राहिले नाही हे सांगता येणार नाही असं वक्तव्य केलं. महायुतीमध्ये समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनी सर्वांना निमंत्रण दिले होते. पण लंके का उपस्थित राहिले नाही हे सांगता येणार नाही आणि ते महायुतीच्या विरोधात एखादी भूमिका घेतील असे मला वाटत नाही असेही विखे पाटील म्हणाले. बाईट- राधाकृष्ण विख पाटील, महसुल मंत्री
महायुतीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजप खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी खासदार सुजय विखे यांना आमदार निलेश लंके मेळाव्याला उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी महायुतीच्या वतीने सर्वांना निमंत्रण देण्यात आलं आहे, मात्र कुणी जर उपस्थित राहिले नाही तर त्याची बातमी व्हावी असं काही नाही असं म्हटलं होतं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.