*मुळाचे पाणी मराठवाड्यास सोडण्यास आ गडाखांचा तीव्र विरोध*.
.जायकवाडीत पाणी असतांना मुळाचे पाणी सोडण्याचा अट्टहास कशासाठी
नागरिकांचा तीव्र संताप.
सोनई.
मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतांना 'समन्यायी'च्या नावाखाली मराठवाड्याला पाणी सोडणे अयोग्य असून प्रामुख्याने नेवासा तालुक्यासाठी अन्यायकारक असल्याचे मत माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले आहे. मुळाचे पाणी राजकीय दबावाखाली जर जायकवाडीला सोडण्यास आले तर
नेवासा तालुक्याला याचा मोठा फटका बसणार आहे जायकवाडीत पुरेसा पाणी साठा शिल्लक असतांना राजकीय दबावाखाली मुळाचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा घाट घातला जातो आहे जर मुळा धरणातून खाली पाणी सोडण्याचा निर्णय झाला तर लाभधारक शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारण्याचा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे.
नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून समन्यायी कायद्याच्या माध्यमातून मराठवाड्याला पाणी सोडण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करताना आ. गडाख म्हणाले की, बहुतांश मान्सून काळ कोरडा गेल्याने नगर जिल्ह्याच्या मुळा व भंडारदरा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. धरणाच्या पाणी साठ्यामध्ये वाढ होण्याची कुठलीही शक्यता नाही. मागील वर्षी आपल्याकडे पाणी असताना १० हजार दलघफू इतके अतिरिक्त पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहिले होते. परंतु यंदा परिस्थिती वेगळी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर अगोदरच भीषण संकटांचा डोंगर उभा आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पिकांना भाव मिळत नाही, राज्यातील कारखानदारी अडचणीत आली आहे, अशा सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये समन्यायीच्या आडून मराठवाड्याला पाणी सोडू नये अशी भावना नगर जिल्ह्याची असल्याकडे आमदार गडाख यांनी यानिमित्ताने लक्ष वेधले आहे. मुळा धरणातून जायकवाडीत पाणी सोडल्यास त्याचा सर्वात जास्त फटका नेवासा तालुक्याला बसणार असल्याने पाणी न सोडण्याच्या मागणीस आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगर जिल्ह्यातील लोकभावनेचा अनादर करून खाली पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यास लाभधारक शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरणार असल्याचे गडाख यांनी सांगितले व हक्काच्या पाण्यासाठी तीव्र संघर्ष करण्याचा इशारा आ गडाख यांनी यावेळी दिला. मुळा सहकारी साखर कारखान्याच्या
46 व्या गळीत हंगाम
बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ प्रसंगी आ शंकरराव गडाख बोलत होते
मा खा यशवंतराव गडाख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुळाचे चेअरमन
नानासाहेब तुवर यांनी केले याप्रसंगी मा सभापती
कारभारी जावळे,
अशोकराव गायकवाड,
ॲड. बापूसाहेब गायके आदींनी मनोगत व्यक्त केले
बॉयलर पूजा विधी शुभहस्ते
कारभारी काशिनाथ डफाळ
सौ. कांताबाई कारभारी डफाळ
निलेश विठ्ठलराव पाटील
सौ अनिता निलेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी मुळा सह साखर कारखाना संचालक मंडळ,विविध संस्थांचे पदाधिकारी,कारखाना सभासद,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जायकवाडी धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक असतांना फक्त राजकीय दबावाखाली मुळा धरणातून पाणी सोडुन
नेवासा तालुक्यातील शेतीच उध्वस्त करण्याचा जो घाट घातला जात आहे त्याविरोधात नेवासा तालुक्यात तीव्र संतापाची लाट आहे
मुळाचे पाणी जायकवाडीस सोडू नये यासाठी नेवासा तालुक्यातील शेतकरी
आ शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत.