नाशिकच्या शिंदे एमआयडीसीत साकीनाका पोलिसांनी कारवाई करून ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त केला. पोलिसांनी कारवाई करून सुमारे 300 कोटी 26 लाख रुपयांचे एमडी जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली. गेल्या दहा महिन्यांपासून या कारखान्यात बनत असलेले एमडी हे तस्करामार्फत मुंबईत सप्लाय केले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
गेल्या महिन्यात साकीनाका पोलिसांनी अन्वर सय्यदला अटक करून त्याच्याकडून 10 ग्रॅम एमडी जप्त केले होते. त्याच्या चौकशीत जावेद खान, आसीफ शेख आणि इक्बाल अलीचे नाव समोर आले. पोलिसांनी धारावी येथे छापा टाकून त्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 90 ग्रॅम एमडी जप्त केले. त्या तिघांची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीनंतर पोलिसांनी सुंदर शक्तिवेल, हसन शेख, आयूब सय्यदला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 10 ग्रॅम एमडी जप्त केले. पोलिसांनी हसनची चौकशी केली. धारावी येथे राहणाऱ्या हसनकडून ते ड्रग खरेदी करत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी धारावी येथून हसनलादेखील अटक केली. हसनच्या चौकशीत आरीफ शेखचे नाव समोर आले. आरीफ हा हैदराबादला असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीनंतर साकीनाका पोलिसांचे पथक हैदराबाद येथे गेले. तेथून पोलिसांनी आरीफला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 110 ग्रॅम एमडी आणि गावठी कट्टा, 7 जिवंत काडतुसे आणि 4 लाख रुपये जप्त केले.
आरीफ हा जे.जे. मार्ग येथे राहणाऱ्या नासीर शेख ऊर्फ चाचाकडून एमडी घेत असल्याचे समजले. पोलिसांनी जे.जे. येथे सापळा रचून चाचाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 किलो 250 ग्रॅम एमडी जप्त केले. पोलिसांनी शेखची चौकशी केली. तो ते एमडी ड्रग कल्याण शिळफाटा येथे राहत असलेल्या रिहान अन्सारीकडून घेत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शिळफाटा येथून रिहान अन्सारी आणि असमत अन्सारीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 15 किलो एमडी जप्त केले. त्याबाबत पोलिसांनी रिहानची चौकशी केली.
जिशानच्या अटकेसाठी पोलिसांचा खास प्लान
रिहानच्या चौकशीत जिशान शेखचे नाव समोर आले. जिशान हा नाशिक येथून ते एमडी आणत असल्याचे उघड झाले. जिशानच्या अटकेसाठी पोलिसांनी खास प्लान केला. परिमंडळ-10चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, सहाय्यक निरीक्षक मैत्रानंद खंदारे आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांचे पथक नाशिकच्या शिंदे एमआयडीसी येथे गेले. त्या कारखान्यात पोलिसांनी छापा टाकून जिशान शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 133 किलो एमडी जप्त केले. साकीनाका पोलिसांची यंदाच्या वर्षातील ही मोठी कारवाई आहे.