दिग्रस, 9 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमातून थेट भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळ-वाशीमच्या दिग्रसमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित केलं. यात त्यांनी राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती तसंच समान नागरी कायद्यावरून सुरू असलेल्या चर्चांवरही थेट भूमिका जाहीर केली आहे.'महागाई बेरोजगारीवर बोललं की वेगळं पिल्लू सोडून आपल्यामध्ये भांडण लावतात. समान नागरी कायदा काय आहे हे एकदा कळू द्या, आम्ही विरोध नाही करत. पण एक देश एक पक्ष आहे, हे आम्हाला मान्य नाही. भाजप एकच राहील, इतर पक्ष आम्ही चालवू, असं चालणार नाही. सबका मालिक एक असं चालणार नाही, शिंदे-राष्ट्रवादीचे मालक एकच,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी समान नागरी कायद्यावरूनही टोला लगावला.'माझं आणि अमित शाह यांचं अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री करायचं ठरलं होतं. तेव्हा मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा होता. ठरलं तसं झालं असतं तर आज भाजपचा अधिकृत मुख्यमंत्री असता, पण यांना शिवसेना हवी आहे, पण ठाकरे नाव नको आहे,' असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला आहे.'आपले पंतप्रधान मध्यप्रदेशमध्ये राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करतात, त्यानंतर चार दिवसांमध्येच पक्ष आपल्याकडे आणला. इथल्या खासदारांवर भाजपने भ्रष्ट असल्याचा आरोप केला, त्यांनी मोदींना राखी बांधली. ज्यांच्यावर चौकशीचे शुक्ल काष्ट लावले त्यांन मी यांच्या घरी पाठवणार. तुम्ही मेहबुबा मुफ्तीसोबत गेले ते चालतं, पण शिवसेना कुठे गेलेली चालत नाही, हे हिंदुत्व आहे का?' असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. 'आमचे 40 आमदार आणि 10 अपक्ष फोडले त्यानंतर यांचं संख्याबळ 160-165 पर्यंत गेलं, पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची काय गरज होती?' असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.'राज्यात एक फूल दोन हाफ, आमचं तीन चाकांचं तर तुमचं...', ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे-फडणवीस-दादा!