*हसन मुश्रीफांविरोधात पुरावेच पुरावे असल्याचा 'जप' करणाऱ्या ईडीनेच आता न्यायालयात वेळ वाढवून मागितली*


 कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणी ईडीच्या रडावर असलेल्या कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांना न्यायालयाकडून 25 जुलैपर्यंत दिलासा मिळाला आहे. कारखाना कर्ज प्रकरणात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह तीनवेळा हसन मुश्रीफांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. ईडीने मुश्रीफांविरोधात 35 कोटींचा मनी लाॅड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. 
भूमिकेत बदल तरी केला नाही ना? अशीही चर्चा सुरु
अटकपूर्व जामिनासाठी मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आतापर्यंत मुश्रीफांविरोधात पुरावे पुरावे ईडीकडून सांगितले जात असतानाच आता वेळ वाढवून मागितल्याने भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता भूमिकेत बदल तरी केला नाही ना? अशीही चर्चा सुरु झाली आहे. मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून ते थेट मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. सर्व बदललेल्या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर ईडीच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. 
ईडीकडून वेळ वाढवून मागण्यात आल्यानंतर मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी 25 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. दरम्यान, मुश्रीफांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी आज अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 25 जुलैपर्यंत तहकूब केली आहे. दरम्यान, मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर ते मंजूर केले आहेत. मुश्रीफ यांच्याबाबत केंद्रीय तपास यंत्रणा काय भूमिका घेणार, याबाबत उच्च न्यायालयाने मागील सुनावणीला प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर माहिती घेण्यात येईल, असे उत्तर सरकारी वकिलांनी दिले होते. आज झालेल्या सुनावणीत ईडीकडून अवधी मागण्यात आला. 
तेच मुश्रीफ भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले; उद्धव ठाकरेंचा बोचरा बाण
दुसरीकडे, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडाळी केल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून ईडीच्या रडारवर आणि अटकेची टांगती तलवार असलेल्या मुश्रीफ यांनीही बंडखोरी करत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. ईडीच्या छापेमारीने त्रस्त झालेल्या मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी आम्हालाच एकदाच येऊन गोळ्या घालून जा, अशी हताश होऊन प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांना अश्रुही अनावर झाले होते. नेमका हाच धागा पकडत ठाकरे यांनी अमरावतीमध्ये बोलताना मुश्रीफांवर बोचरा बाण सोडला होता. उद्धव ठाकरेंनी अमरावतीमधील सभेत या प्रसंगाची आठवण करून देत तेच मुश्रीफ भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत जाऊन बसल्याची प्रतिक्रिया दिली. 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.