नाशिक एसटी बस अपघात: बस ४०० फूट खोल दरीत कशी कोसळली?, बचावलेल्या कंडक्टरनं सांगितलं कारण

नाशिक : सप्तशृंगी गडावरील घाटात गणपती टप्प्याजवळ एसटी बसचा खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून इतर १३ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात एसटी बसचे कंडक्टर यांनी या अपघाताच्या वेळची स्थिती कथन करत सांगितले आहे.एसटी बसचे कंडक्टर पुरुषोत्तम टिकार हे अकोल्याचे रहिवासी आहेत. मात्र ते नोकरीनिमित्त बुलढाणा येथे स्थायिक झाले आहेत. टिकार यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी टिकार यांनी माहिती देताना सांगितले की सकाळी साडे सहाची वेळ होती. आम्ही बरोबर साडेसहा वाजता बस स्टँडवरून निघालो. १० ते १२ मिनिटांनंतर गणपती टप्प्याजवळ आम्ही पोहोचलो. रस्त्यावर दाट धुकं पसरलेलं होतं. तेथे एक वळण होतं. दाट धुक्यामुळं हे वळण कदाचित चालकाच्या लक्षात आलं नाही. यामुळेच बसचा अपघात झाला. या बसमध्ये २२ ते २३ प्रवासी होते.' पुरुषोत्तम टिकार हे खामगाव जिल्हा बुलढाणा आगारात गेल्या १४ वर्षांपासून वाहक म्हणून कार्यरत आहेत. खमागाव - सप्तशृंगी गड - खामगाव ह्या मुक्कामी बसवर ते गेल्या काही वर्षात कित्येकवेळा आलेले आहेत. टिकार यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरम्यान मंत्री अनिल पाटील, गुलाबराव पाटील यांनी भेट घेतली. या अपघातानंतर तातडीने जखमींवर वणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करण्यात आले. मात्र जे प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातग्रस्त एसटी बसमध्ये चालक आणि वाहक मिळून एकूण २३ प्रवासी प्रवास करत होते. यांपैकी बहुतेक प्रवासी हे जळगाव जिल्ह्यातील मुडी या गावातील आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अपघातग्रस्तांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जळगाव जिल्ह्यातील मंत्री अनिल पाटील यांनीही अपघातग्रस्तांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.