*महिलांनी कृषिप्रक्रिया व्यवसायात संधी – तोरडमल*
शेती क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग महत्वाचा असून शेती निगडीत प्रक्रिया उद्योगामध्ये महिलांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. याचा फायदा घेऊन महिलांनी सक्षम व्हावे असे प्रतीपादन सौ. अपूर्वा तोरडमल, जिल्हा संसाधन व्यक्ती, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना यांनी केले. श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली च्या ९५ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित ३ दिवसीय तंत्रज्ञान दिवसाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
भारतातील कृषि क्षेत्रातील सर्वोच्च संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा दिनांक १६ जुलै हा दिवस प्रत्येक वर्षी स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात्त येतो. या वर्षी दिनांक १६ ते १८ जुलै २०२३ दरम्यान तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात येत आहे. दिनांक १७ जुलै रोजी शेतकरी महिलांसाठी परसबागेतील पोषण बाग, परस बागेतील कुक्कुटपालन, कृषि माल प्रक्रिया उद्योग इ. विषयांवर केव्हीके शास्त्रज्ञांमार्फत व्याखाने तसेच कृषि प्रदर्शनाचे आयोजन केव्हीके, दहिगाव ने येथे आयोजित करण्यात आले होते. महिलांना शेतमाल उत्पादन ते प्रक्रिया संधी उपलब्ध असून त्यासाठी शासकीय योजनेचा लाभही ते घेऊ शकतात. यासाठी केव्हीके दहिगाव-ने शेती सलग्न व्यावसायिक मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी उपलब्ध असून त्याचा लाभ महिला शेतकऱ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन केव्हीके, दहिगाव ने प्रमुख डॉ. कौशिक यांनी याप्रसंगी केले.
या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला शेतकरी व समाज विकास समिती यांनी स्थापन केलेल्या स्वयंसहाय्यता गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जिजामाता कृषि तंत्र विद्यालय, भेंडा येथील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित महिलां व विद्यार्थ्यांना केव्हीके प्रक्षेत्रावरील पोषणबाग, कृषि प्रदर्शन तसेच तंत्रज्ञान प्रात्यक्षिके दाखविण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना फळ रोपांचे वाटप करण्यात आले.