नायगावातून सव्वा तीन हजार ब्रास वाळूची विक्री; प्रशासनाला ४४ लाखांचा महसूल,
बेकायदेशीर वाळू उपशाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने वाळूचे नवे धोरण जाहीर केले. त्यात ग्राहकांना ६०० रुपये ब्रासने वाळू देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील वाळू डेपाेतून तीन हजार २२७ ब्रास वाळूची विक्री झाली आहे. आतापर्यंत ऑनलाईन बुकिंगद्वारे १ हजार ३२ ग्राहकांनी ६०० रुपयांनी वाळू खरेदी केली आहे.
वाळूसाठी दरराेज दाेनशेहून अधिक ग्राहक ऑनलाइन बुकिंग करत आहे. पहिल्या डेपाेतून विकलेल्या वाळू विक्रीतून ४४ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. आजमितीला ८ हजार ८३० ग्राहकांनी वाळू बुकिंग केली आहे. आतापर्यंत विविध नदीपात्रांतून उपसा करून बाहेर काढलेली १६ हजार ७४६ ब्रास वाळू जमा झाली आहे. सध्या या वाळू डेपोत १३ हजार ५१९ ब्रास वाळू शिल्लक आहे. आणखी नऊ वाळू डेपो प्रस्तावित आहेत. ऑनलाइन संकेतस्थळाबरोबरच ग्राहकांना आता जवळच्या सेतू केंद्रांतून देखील वाळू ऑनलाईन बुक करता येणार आहे.