नेवासा प्रतिनिधी-
नेवासा- तालुक्यातील वरखेड येथील यात्रेत लाखो भाविकांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन..
नेवासा
तालुक्यातील वरखेड येथे मंगळवारी
दि.११ एप्रिल रोजी श्री महालक्ष्मीदेवीच्या यात्रेच्या निमित्ताने रखरखत्या उन्हामध्ये ही महालक्ष्मी मातेच्या नावाचा जयघोष करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले.भाविकांनी केलेल्या देवीच्या नावाच्या जयघोषाने वरखेड क्षेत्र दुमदुमले होते.नियोजन कोलमडल्याने येथील रस्ते गर्दीने फुलून गेल्याने ट्रॅफिक जॅम झाली होती त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन भाविकांनी मोठा त्रास सहन करावा लागला. वरखेड येथील यात्रा उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध असा आहे.नवसाला पावणारी श्री महालक्ष्मीदेवी म्हणून लाखो भाविक यात्रेसाठी येतात आपले नवस फेडतात.शुक्रवारी यात्रेनिमित्त मानाच्या पालखी सह विविध पालख्यांचे फटाक्यांच्या आतषबाजी करत स्वागत करण्यात आले.सोमवारी रात्री बरेच भाविक याठिकाणी मुक्कामी होते.मंगळवारी यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे पासूनच भाविकांची दर्शन करण्यासाठी मोठी रीघ लागली होती.आलेल्या भाविकांचे यात्रा कमिटी व देवस्थानचे उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे,सचिव कडुबाळ गोरे,खजिनदार रामभाऊ हारदे,विश्वस्त रंगनाथ पवार,नवनाथ वाघ,सुरेश शिरसाठ, रावसाहेब कुंढारे,रामचंद्र कुंढारे,रामदास गोरे,भगवान जगधने,उत्तम शिरसाठ,बाळासाहेब शिरसाठ यांनी स्वागत केले.
भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांसह पोलीस,पोलीस मित्र,होमगार्ड या यंत्रणेने सेवा देत स्वयंसेवकांची भूमिका बजावली. वरखेड देवी मंदिर प्रांगण भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.विविध प्रकारच्या अनेक दुकाने शामियाना उभारून थाटण्यात आली होती.त्यामुळे येथील मंदिर प्रांगण गर्दीने फुलून गेले होते.भाविकांनी नवस फेडण्यासाठी बोकड व कोंबडीचा नैवैद्य देवी चरणी अर्पण केला तर कोणी नवसाची घंटी, कोणी पूरणावरनाचा शाकाहारी नैवैद्य अर्पण करून खणानारळाने ओटी भरून आपल्या नवसाची पूर्तता केली.सजविलेल्या महालक्ष्मीदेवीची वाजतगाजत निघालेली मिरवणुका भाविकांचे आकर्षण ठरले होते. रखरखत्या उन्हाचा तडाखा असतांना देखील देवीच्या दर्शनाची आस भाविकांमधून दिसून येत होती.शिरसगाव पासून ते वरखेड पर्यंतचा रस्ता वाहनांनी व्यापल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.पोलीस संख्या मोजकीच असल्याने त्यांना पोलीस मित्र संघटनेने मदत केली,मंदिर परिसरात रस्ते असल्याने ट्रॅफिक जॅम झाली होती त्यामुळे पायी चालणाऱ्यांच्या भाविकांचे ही खूप हाल झाल्याचे चित्र दिसून येत होते.
वरखेड यात्रेच्या संदर्भात प्रशासनासह विविध संघटनांच्या नियोजन बैठका झाल्या मात्र नियोजन कोलमडल्याने त्याचा त्रास भाविकांना सोसावा लागला,मंदिर प्रांगणात छोटी मोठी वाहने घुसल्याने यात्रेकरूंना चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
वरखेड गावातील अरुंद रस्ते ही वाहतूक विस्कळीत होण्यास कारणीभूत ठरली असल्याचे यात्रेकरूंमध्ये चर्चा होती,पिण्याच्या पाण्यासाठी यात्रेकरूंना विकत पाणी घ्यायची वेळ आली होती,
यात्रेत इतर ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली मात्र ते पिण्या लायक नसल्याचे ही भाविक प्रतिक्रिया देतांना बोलत होते.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधीची तरतूद झाल्यास येणाऱ्या अडचणी व इतर जागेचा ही प्रश्न सुटू शकतो
अशी ही भावना भाविक व्यक्त करतांना दिसत होते.