*निद्रिस्त गणपती*
मु.आव्हाने, तीसगाव, अहमदनगर.
संकलन - सुधीर लिमये पेण
झोपलेल्या हनुमानाची देशात मंदिरे आहेत. पण झोपलेल्या म्हणजेच निद्रिस्त अवस्थेतील गणपती कधी कुठे बघायला मिळत नाही. पण, अहमदनगर जिल्ह्यातील आव्हाणे गावी असंच एक देऊळ आहे, जिथे झोपलेल्या गणेशाची मूर्ती आहे आणि ही मूर्ती स्वयंभू आहे.
अहमदनगरच्या तीसगाव शहरापासून जवळच असलेल्या आव्हाणे गावात पूर्वी कोणी दादोबा देव नावाचे गणेशाचे वयोवृद्ध भक्त रहात असत. ते दरवर्षी न चुकता मोरगावची वारी करीत असत. पण एक दिवस वयोमानामुळे ही वारी त्यांना झेपेनाशी झाली.
त्यावेळी मोरया गोसावी यांचा दादोबांना दृष्टांत झाला की आता त्यांनी ही वारी थांबवावी. पण दादोबांच्या निस्सीम गणेशभक्तीने काही हे ऐकलं नाही आणि दादोबा वारीसाठी निघाले. त्यांच्या वारी मार्गातील एका ओढ्याला खूप मोठा पूर आलेला त्यांना दिसला, त्यावेळी दादोबांनी मोरया गोसावींचं नाव घेतलं आणि ओढ्यात उतरले. पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर दादोबा कुठेतरी लांब वाहत गेले, त्यानंतर कसेबसे जमिनीवर पोहोचले. चहूबाजूंनी ओढ्याचं पाणी आणि मध्येच एका जमिनीच्या तुकड्यावर दादोबा. त्यावेळी गणपतीचा त्यांना दृष्टांत झाला की, "मीच तुझ्या गावी येत आहे.." पुढे या दादोबा देवांचे निधन झाले.
त्यानंतर एकदा आव्हाणे गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ कुठल्या टणक वस्तूला लागला आणि नांगर तिथेच थांबला. काय आहे शेतात म्हणून तिथली जमीन खोदत असताना आतून गणेशाची मूर्ती बाहेर काढण्यात आली.
त्याच वेळी दादोबा देवांच्या मुलाला म्हणजेच गणोबा देव याला दृष्टांत झाला की ही मूर्ती जशी आहे तशीच असू देत आणि त्याच अवस्थेत तिची पूजा कर. तीच स्वयंभू मूर्ती म्हणजे हा निद्रिस्त गणेश.
या मूर्तीच्या छातीवर नांगराच्या फाळाची खूण अजूनही दिसते. गणेशाचं हे मंदिर प्रशस्त आहे आणि गाभाऱ्यात जमिनीच्या खाली दोन फुटांवर या गणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्यावर काचेचा दरवाजा आहे.
कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधले आणि त्यावेळी त्यांनी दादोबा देवांच्या वंशजांना वतन म्हणून जमिनी दिल्या. त्यानंतर या वंशजांची आडनावे जहागीरदार, भालेराव अशी पडली.
तर हे झोपलेल्या म्हणजेच निद्रिस्त अवस्थेतील गणेशाचे महाराष्ट्रातीलच नाही तर बहुदा देशातीलच एकमेव स्वयंभू गणेश मूर्तीचं मंदिर.