अग्निपथ योजनेंतर्गत केंद्र सरकारने लष्करात अग्निवीर म्हणून चार वर्षांसाठी युवकांना भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात देशातील अनेक राज्यांत विविध संघटनांची आंदोलनं सुरू आहेत. आता यामध्ये शेतकर्यांनीही उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेने २४ जून रोजी देशभर तीव्र आंदोलन करण्याची हाक दिली आहे, अशी माहिती किसान सभेचे डॉ.अजित नवले यांनी दिली.सैन्य दलात सहभागी होऊ पाहणारे बहुतेक विद्यार्थी, युवक हे शेतकरी कुटुंबातील आहेत. सीमेवर देशाचे रक्षण करणारे बहुतांश सैनिक गणवेशधारी शेतकरीच आहेत. संयुक्त किसान मोर्चाने यामुळेच सीमेवर लढणार्या व सैन्यात भरती होऊ पाहणार्या सैनिकांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे डॉ. नवले यांनी सांगितले.महाराष्ट्रामध्ये २४ जूनला किसान सभेच्या सर्व शाखा या आंदोलनात सहभागी होत आहेत. किसान सभेकडून तहसीलदार कार्यालयांसमोर निदर्शने करून या योजनेचा निषेध करणारी निवेदने राज्यभरातील सर्व तहसीलदारांना दिली जाणार आहेत. शेतकरी, युवक, विद्यार्थी व जनतेने तीव्र निषेध करावा व आंदोलनात सक्रीय व्हावे, असे आवाहन डॉ. नवले यांच्यासह डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख आदिंनी केले आहे.