सोनई .येथिल पोलीस ठाण्याचे तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल, उपनिरीक्षक उमेश पतंगे आणि दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन निलंबित करावे या मागणीसाठी गणेशवाडी व सोनई येथील युवकांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
सोमवारी दि.7 रोजी ठिय्या मांडून उपोषण करण्यात येणार आहे.गणेशवाडी येथील राजेंद्र मोहिते आणि सोनई येथील तुषार देव्हारे यांना कुठलाही गुन्हा दाखल नसतांना अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप मोहिते व देव्हारे कुटुंबियांनी केला आहे.कुठलाही गुन्हा नसताना अमानुष मारहाण केल्यानंतर २३ एप्रिल रोजी सोनई पोलीस ठाण्यावर एक हजार युवकांनी धडक मोर्चा काढला होता. यावेळी शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
बारा दिवस उलटूनही कारवाई केली नसल्याने राजेंद्र मोहिते यांचे बन्धू अजय मोहिते व तुषार देव्हारे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की त्याला आणि त्याच्या भावाला खाकीचा धाक दाखवून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. तसेच तक्रार अर्ज मागे घे, मारहाण केली नाही असे तुझ्या अक्षरांत लिहून दे. अन्यथा दोघा भावांना खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी दिली जात आहे. सपोनि बागूल,कर्मचारी संजय चव्हाण व बाबा वाघमोडे हे‘खाकी’चा धाक दाखवून दबाव आणित आहेत असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या आठवड्यात काही अनोळखी व्यक्ती दमबाजी करुन केस मागे घे अन्यथा वाईट परिणाम होतील अशी धमकी देत आहेत.