नेवासा ता. भेंडा.
नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास दोन ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये सोन्याचे दागिने, रोकड असा तीन लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केलाआहे. पहाटे ३.३० दरम्यान दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने चोरी करून पळून जाण्याच्या प्रयत्नात दुचाकी सोडून पोबारा केला भेंडा-गोंडेगाव रस्त्यावरील जालिंदर भिसे, सोमनाथ भिसे यांच्या घरातून ४० हजाराची रोकड, एक तोळ्याची अंगठी, शंकर चौधरी यांच्या घरातून आई, पत्नीचे साडेतीन तोळ्याचे विविध दागिने, ३५ हजाराची रोकड
असा ऐवज चोरट्यांनी पळविला. चोर निघून जात असताना लक्षात आल्यावर शंकर चौधरी यांनी त्यांचा पाठलाग केला. पाठलाग होत असल्याचे लक्षात आल्याबरोबर चोरांनी रस्त्यालगतच दुचाकी सोडून शेतातून पळ काढला व फरार झाले. रस्त्याच्या कडेला विना क्रमांकाची दुचाकी टाकून पळुन गेले. ती सकाळी पंचनामा करताना कुकाणा पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतली.पोलीस कर्मचारी रेवनाथ दहिफळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच नगरहून आलेल्या पथकानेही भेट देऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु, फारसे काही हाती आले नाही. नेवासा पोलीस ठाण्यात याबाबत शंकर चौधरी यांनी तक्रार नोंदविली आहे.