नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने
पोलीस दलांच्या आधुनिकीकरणाची एकछत्री योजना पुढे
सुरु ठेवायला मंजुरी दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित
प्रदेशांच्या पोलिस दलांच्या कामकाजाचे आधुनिकीकरण
आणि त्यात सुधारणा करण्याबाबतच्या केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांच्या प्रस्तावाला या मंजुरीमुळे गती मिळाली
आहे. या योजनेत आधुनिकीकरण आणि सुधारणांसाठी
26,275 कोटी रुपये खर्चासह सर्व संबंधित उप-योजना
समाविष्ट आहेत. अंतर्गत सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था,
आधुनिक तंत्रज्ञानाचा पोलिसांकडून अवलंब, अंमली
पदार्थ नियंत्रणासाठी राज्यांना मदत करणे आणि देशात
एक मजबूत न्यायवैद्यक यंत्रणा विकसित करून कायदा
अंमलबजावणी व्यवस्था मजबूत करण्यासाठी या योजने
अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. राज्य पोलीस
दलांच्या आधुनिकीकरणाच्या योजनेसाठी 4,846 कोटी
रुपये खर्च आहे.