पोलीस पाटलावर झालेल्या हल्ल्याचा नेवासा तालुक्यात निषेध; दोषींवर कडक कारवाईची मागणी
नेवासा (प्रतिनिधि)कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी गावचे पोलीस पाटील श्री. दगडू पाटील गुडघे यांच्यावर डीजे वाद्य बंद करण्याच्या कारणावरून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नेवासा तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
या घटनेतील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने नेवासा तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. संजय बिरादार व नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. महेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
या वेळी संघटनेच्या वतीने नव्याने निवडून आलेल्या नेवासा तालुका कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष म्हणून खडके गावचे पोलीस पाटील श्री. सुभाष पाटील भांगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.
कार्यक्रमात महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. संतोष पाटील पवार, आहील्यनगर जिल्हा सचिव आदेश पाटील साठे, उपाध्यक्ष गणेश पाटील सोमुसे, महिला उपाध्यक्ष सौ. मीनाक्षी रिंधे पाटील तसेच नेवासा तालुक्यातील अनेक पोलीस पाटील बांधव व भगिनी उपस्थित होते.