नेवासामध्ये कामिका एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी; मा. आ. शंकरराव गडाख यांच्या वतीने खिचडी महाप्रसादाचे आयोजन
नेवासा (प्रतिनिधी):
आज आषाढ वद्य कामिका एकादशी निमित्त श्री क्षेत्र नेवासा येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत मोठ्या श्रद्धाभावाने भक्तांनी दर्शन घेतले. नेवासा तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरातून हजारो भाविकभक्तांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. माऊलींचा जयघोष, भजन, गीते आणि हरिपाठाने परिसर भक्तिरसात न्हालेला होता.
याच पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मा. आमदार शंकररावजी गडाख यांच्या वतीने खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. व्यवस्थापन सुयोग्य आणि शिस्तबद्ध असून, कोणत्याही अडचणीशिवाय भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा आनंद घेतला.
या उपक्रमामागील उद्देश म्हणजे संत परंपरेचा सन्मान राखत भक्तांसाठी सेवा भाव जपणे हा असून, “माऊलींची कृपा सतत सर्वांवर राहो,” अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
संत परंपरेला मानवंदना...
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रत्यक्ष पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी प्रत्येक एकादशीला भक्तांनी गजबजलेली असते. यंदाच्या कामिका एकादशीला देखील भाविकांनी माऊलींच्या चरणी लीन होऊन आपल्या श्रद्धेची मुक्त अभिव्यक्ती केली.