नेवासा तालुक्यात मंदिरात गुंडगिरीचा कहर: मंदिरात उद्योजकाचा विश्वस्ताला मारहाण, दहशतीचे वातावरण!
नेवासा तालुका –
पवित्र धार्मिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वर मंदिर देवस्थान परिसरात रविवारी एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला. मंदिराच्या विश्वस्ताला एका स्थानिक उद्योजकाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली असून, त्याचप्रमाणे 50 ते 60 जणांच्या टोळक्याने मंदिर परिसरात थेट दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागच्या दरवाजाने दर्शनासाठी आत जाऊ दिले नसल्यामुळे वादाला सुरुवात झाली. हा वाद काही वेळातच इतका चिघळला की, तो थेट मारहाणीपर्यंत गेला. हा प्रकार घडत असताना मंदिर परिसरात असलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. धार्मिक स्थळी अशा पद्धतीने हातघाईवर येणे हे अत्यंत निषेधार्ह असून, हे संपूर्ण प्रकरण देवस्थान व्यवस्थापन आणि पोलिस यंत्रणेसाठी मोठा इशारा आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, मंदिर परिसरात पूर्वीपासूनच काही टोळक्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू होते. काल घडलेली घटना हे त्या प्रयत्नांचेच फलित आहे. सुमारे 50 ते 60 तरुणांचा जमाव मंदिरात घुसून धक्कादायक गोंधळ घालतो, हेच सांगतं की, नेवासा तालुक्यात गुंड प्रवृत्तीने मंदिरासारख्या पवित्र जागेवरही गदा आणली आहे.
या विश्वस्तावर झालेली मारहाण नसून, संपूर्ण समाजाच्या श्रद्धेवर आणि देवस्थानाच्या प्रतिष्ठेवर झालेला आघात आहे.
नेवासा तालुक्यातील नागरिक आणि भाविकांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता पाहावे लागेल की प्रशासन या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विरोधात कडक भूमिका घेतात की राजकीय दबावाखाली गप्प बसतात.