मावा कारखान्यावर गुन्हे शाखेची धडक कारवाई; ८० हजारांचे साहित्य जप्त, एक अटकेत
सोनई (ता. नेवासा):
घोडेगाव रस्त्यावरील चार नंबर चारीजवळील एका घराच्या आवारात सुरू असलेल्या मावा उत्पादन कारखान्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने धाड टाकून सुमारे ८० हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, अशोक लिपाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
छाप्यादरम्यान सुपारी, सुगंधी तंबाखू, तयार मावा आणि यंत्रसामग्री असे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी तय्युब विबन शेख (रा. सोनई) यास अटक करण्यात आली असून, जितेंद्र नरेंद्र चांडक हा फरार झाला आहे.
या प्रकरणी विशाल तनपुरे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक आरोपी तय्युब शेख यास नेवासे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे