शनिशिंगणापूर ऑनलाइन पूजा अ‍ॅप घोटाळा : सायबर पोलिसांनी दाखल केली गुन्ह्याची फिर्याद, लवकरच धरपकडीची शक्यता


शनिशिंगणापूर ऑनलाइन पूजा अ‍ॅप घोटाळा : सायबर पोलिसांनी दाखल केली गुन्ह्याची फिर्याद, लवकरच धरपकडीची शक्यता

शनिशिंगणापूर, दि. १३ (प्रतिनिधी) – शनिशिंगणापूर देवस्थानच्या नावाने बनावट ऑनलाइन पूजा अ‍ॅप्सच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीप्रकरणी अखेर सायबर पोलिस जागे झाले असून, शनिवारी (दि. १२) रात्री उशिरा पाच अ‍ॅप कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंघे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत या बनावट अ‍ॅपप्रकरणी आवाज उठवून, शनिदेव भक्तांची फसवणूक होत असल्याचे अधोरेखित केले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत गंभीर बाबी उघड झाल्यानंतर, अखेर सायबर पोलिसांनी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पाच अ‍ॅप्सवर गंभीर आरोप

सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत घरमंदिर अ‍ॅप, ऑनलाईनप्रसाद डॉट कॉम, पूजा परी सेवा डॉट कॉम, हरी ओम अ‍ॅप आणि ई-पूजा डॉट कॉम या अ‍ॅप कंपन्यांनी शनिशिंगणापूर देवस्थानचा वापर करून, व्हीआयपी दर्शन, अभिषेक व तेल चढावा यासाठी भाविकांकडून ऑनलाइन पद्धतीने देणग्या गोळा केल्याचा आरोप आहे.

या कंपन्यांनी ना देवस्थानाची परवानगी घेतली, ना धर्मादाय आयुक्तांची. शिवाय देवस्थानाच्या मंदिराचे, महाद्वाराचे आणि शनिमहाराजांच्या शिळेचे फोटो वापरून, खोट्या पुजाऱ्यांमार्फत पूजा आणि अभिषेक होईल, असा भ्रामक मजकूर प्रसारित केला. त्यामुळे भक्तांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली

सदर गुन्ह्याचा तपास सध्या अहिल्यानगर सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी मोरेश्वर पेंदाम करत आहेत. अ‍ॅप कंपन्यांचे तांत्रिक तपशील, यूआरएल आणि व्यवहारांची तपासणी केली जात असून, दोषींवर लवकरच कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.