भारतीय स्वाभिमानी संघाचा संतप्त निषेध
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याविरोधात निवेदन सादर
नेवासा (प्रतिनिधी): सामाजिक परिवर्तनासाठी लढा देणारे, बहुजन समाजाच्या हक्कासाठी झगडणारे, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर संपूर्ण विचारसरणीवर आणि बहुजन चळवळीवर झालेला हल्ला आहे. या भ्याड, कायर आणि निष्कारण हल्ल्याचा भारतीय स्वाभिमानी संघाने तीव्र शब्दांत निषेध करत आज नेवासा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार चांदेव बोरुडे साहेब यांना निवेदन सादर केले.
हा हल्ला लोकशाहीच्या मूल्यांवर आणि विचार मांडण्याच्या स्वातंत्र्यावर आघात करणारा आहे. समाजात द्वेष पसरवून, भय निर्माण करून परिवर्तनाच्या शक्तींना दाबण्याचा हा कटकारस्थानी प्रयत्न असून, भारतीय स्वाभिमानी संघ अशा प्रत्येक हल्ल्याच्या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा सज्ज इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर गणपतराव मोरे (महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य, भारतीय स्वाभिमानी संघ), ज्ञानदेव झिंजुर्डे (अध्यक्ष, अहिल्यानगर), संभाजी मावळदे (अध्यक्ष, काँग्रेस आय, नेवासा), विठ्ठलराव शेटे (उपाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, नेवासा), अंजुम पटेल (शहर अध्यक्ष, नेवासा), आणि पोपटराव सरोदे (अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, अहिल्यानगर) यांच्यासह विविध मान्यवरांच्या सह्या आहेत.
भारतीय स्वाभिमानी संघाने मागणी केली की,
या हल्ल्यामागील सूत्रधारांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
प्रवीण दादांना शासन पातळीवर संरक्षण द्यावे.
या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र यंत्रणेमार्फत व्हावी.
संघटनेने असा इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची जबाबदारी संपूर्णपणे शासनाची असेल.