नेवासा पोलिसांची कामगिरी : चोरीस गेलेले सोने मूळ मालकास परत
नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे १५ जानेवारी २०२५ रोजी एकाच दिवशी तीन ठिकाणी झालेल्या जबरी चोरीच्या घटनांपैकी एका घटनेतील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने नेवासा पोलिसांनी तपासादरम्यान हस्तगत करून न्यायालयाच्या आदेशानंतर मूळ मालक पुष्पा चामुटे यांना १७ जून रोजी परत केले. या तिन्ही चोरीच्या घटनांची फिर्याद स्वप्नाली बाबासाहेब आरगडे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिली होती. दुपारी अडीचच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी तीन ठिकाणी जबरदस्तीने चोरी करून एकूण ७ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता.
या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, हवालदार साठे, कॉन्स्टेबल नारायण डमाळे, आप्पा तांबे, अमोल साळवे आणि अंबादास जाधव यांनी अत्यंत काटेकोरपणे केला. तपासादरम्यान नेवासा पोलिसांना संभाजीनगर शहरात घडलेल्या अशाच प्रकारच्या चोरीच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले. हे फुटेज तपास पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अहिल्यानगर यांच्यासोबत शेअर करून आरोपींची ओळख पटवण्यात आली. त्यानुसार आरोपी सचिन ईश्वर भोसले (राहणार. बेलगाव, तालुका. कर्जत) व गाड्या उर्फ गाडेकर झरक्या चव्हाण (राहणार. नागझरी, तालुका. गेवराई, जिल्हा. बीड) हे सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर आरोपींना अटक केली.
सौंदाळा येथे जबरी चोरीमध्ये चोरून नेलेले सोन्याचे ७ ग्रॅम वजनाचे दागिने आरोपींकडून हस्तगत करण्यात आले. हे दागिने परत मिळवण्यासाठी मूळ मालक पुष्पा चामुटे यांनी नेवासा न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार हे दागिने त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेतील इतर चोरट्यांकडून चोरी गेलेल्या सोन्याचा तपास अद्याप सुरू असून, फिर्यादी स्वप्नाली आरगडे यांच्या बाबतीतील तपासही पोलीस करत आहेत. नेवासा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे चोरीस गेलेले मौल्यवान दागिने मूळ मालकास परत मिळाले असून नागरिकांमधून पोलीस दलाच्या कार्याची प्रशंसा होत आहे.