शेतकऱ्यांवर लाठीचार्ज प्रकरणी नेवासा तहसीलवर काँग्रेससह विविध संघटनांचा मोर्चा; निषेधाचे निवेदन तहसीलदारांना सुपूर्द



शेतकऱ्यांवर लाठीचार्ज प्रकरणी नेवासा तहसीलवर काँग्रेससह विविध संघटनांचा मोर्चा; निषेधाचे निवेदन तहसीलदारांना सुपूर्द

नेवासा (प्रतिनिधी गणेश झगरे) – पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यास झालेल्या विरोधात, आणि या पार्श्वभूमीवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ आज नेवासा तहसील कार्यालयावर काँग्रेससह विविध शेतकरी संघटना आणि पक्षांकडून मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.

मोर्चादरम्यान बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी सरकारवर जोरदार टीका करत सांगितले की, "सत्तेवर येताना पूर्ण कर्जमाफीचं आश्वासन देणारे सरकार आता शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेत आहे. हे सरकार हिटलरशाही मार्गावर चालत असून शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत झुकू नये."

शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी पोलिस लाठीचार्जविषयी म्हणाले की, "लाठीचार्जचे आदेश देणारे कोण होते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. जे पोलीस शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करत आहेत, ते जनरल डायरपेक्षाही क्रूर असून त्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे."

पुरंदर विमानतळासाठी प्रस्तावित सात गावांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला असून, एकतपूर गावात ड्रोन सर्वेक्षणासाठी आलेल्या सरकारी पथकास शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने विरोध केला होता. मात्र, या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज करत अमानुषपणे कारवाई केली. या लाठीचार्जमध्ये एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला असून शेकडो शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या नेवासा मोर्चात त्रिंबक भदगले, अण्णासाहेब पटारे, अॅड. सागर सागडे, अॅड. ज्ञानेश्वर शिरसाठ, अॅड. बाबासाहेब कावले, गुलाबभाई पठाण, संजय होडगर, युसूफ शेख, विजय शिंदे, दिगंबर आवारे, शेषराव गव्हाणे, दत्तात्रय निकम, असिफ पटेल यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

स्वाभिमानी संघाचे गणपत मोरे यांनी जाहीर इशारा दिला की, "या जुलमी सरकारला उखडून फेकण्याची वेळ आली आहे." तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव काळे यांनी सांगितले की, "शेतकरी सरकारला धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडले जाईल."

बसपाचे हरीश चक्रनारायण, मराठा संघाचे गणेश झगरे आणि इतर अनेक नेत्यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला व शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला.

या आंदोलनाच्या शेवटी नेवासा तहसीलदार संजय बिरादार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.