विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी: 'मिशन आरंभ' अंतर्गत शिष्यवृत्ती पूर्व तयारी सराव चाचणीचे आयोजन
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची भीती कमी करण्याच्या उद्देशाने 'मिशन आरंभ' अंतर्गत शिष्यवृत्ती पूर्व तयारी सराव चाचणीचे आयोजन करण्यात आले. ही चाचणी नेवासा तालुक्यातील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल आणि सुंदर बाई विद्यालय येथे संपन्न झाली.
या उपक्रमाबाबत माहिती देताना शिक्षक कैलास म्हस्के यांनी सांगितले की, "विद्यार्थ्यांच्या जीवनात शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच अशा परीक्षांची सवय व्हावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे."
या चाचणीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेतील वेळेचे नियोजन, प्रश्न सोडवण्याचे तंत्र आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळेल. या परीक्षेचे आयोजन इयत्ता चौथी व सातवी साठी केले जाते. यातून विद्यार्थ्यांची इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्तीची पूर्व तयारी होते. शिक्षण क्षेत्रात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीत मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.