#नेवासा #news #
#सोनई (ता. २७) - यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त, यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय, वडगाव गुप्ता येथे शैक्षणिक संकुलाचे "प्रशांत संकुल" प्रवेशद्वाराचे लोकार्पण, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि अवांतर वाचनासाठी आवश्यक असलेल्या ओपन वाचनालय इमारतीचे भूमिपूजन, तसेच वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम २७ डिसेंबर रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि माजी मंत्री शंकरराव गडाख, मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, यशवंतराव चव्हाण फाउंडेशनच्या उपाध्यक्ष नेहल गडाख, डॉ. सुभाष देवढे पाटील (कार्यकारी संचालक, यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी, डॉ. सुभाष देवढे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर, पद्मश्री पोपटराव पवार यांनी आपल्या भाषणात प्रशांत गडाख यांच्या सामाजिक कार्याबद्दल प्रशंसा केली आणि त्यांना 'माळरानावर शैक्षणिक संकुल उभारणारे' एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून गौरवले. त्यांनी यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयाच्या परिसराला प्रशांत गडाख यांचे नाव दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
पोपटराव पवार यांनी मौखिक आरोग्याच्या समस्यांचे महत्त्व सांगितले आणि दंत महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य असल्याचे ठामपणे सांगितले. महाविद्यालय परिसरात केलेले वृक्षारोपण आणि त्याच्या संगोपनामुळे ते 'वनराई'च्या रूपात बदलले असल्याचे त्यांनी उल्लेख केले. पर्यावरण संरक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगत, यशवंत प्रतिष्ठानच्या पर्यावरण संवर्धन कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, पद्मश्री पोपटराव पवार आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते नेवासा तालुक्यातील हिंगोनी, सोनई, मोरया चिंचोरे, शिरेगाव, म्हाळस, पिंपळगाव येथील सार्वजनिक पुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी, नगर शहरासह नेवासा तालुक्यातील विविध गावांमधील संस्थेचे पदाधिकारी, प्रशांत गडाख मित्रमंडळाचे सदस्य, महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अखेरीस, नेहल गडाख यांनी उपस्थितांचे आभार मानले.