नेवासात ७ डिसेंबरला इस्रोचे 'स्पेस ऑन व्हील' फिरते प्रदर्शन
नेवासा (तालुका प्रतिनिधी) - दि. ७ डिसेंबर रोजी मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात 'स्पेस ऑन व्हील' नामक फिरते प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि विज्ञान भारती यांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, या प्रदर्शनामध्ये शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना इस्रोद्वारा निर्मित उपग्रह प्रक्षेपण यांची आणि इतर अंतराळविषयक माहिती प्रतिकृतीद्वारे दिली जाईल.
प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी तालुक्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 'स्पेस ऑन व्हील' हे प्रदर्शन बसमध्ये आयोजित करण्यात आले असून, पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात या प्रदर्शनाची भेट होईल. प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन आणि उपग्रह प्रक्षेपणाच्या विविध प्रक्रिया आणि महत्वाबद्दल माहिती मिळवता येईल.
प्रदर्शनात सहभागी शाळांना, विद्यार्थ्यांना आणि स्वयंसेवकांना इस्रोकडून प्रमाणपत्र दिले जाईल. याशिवाय, संस्थेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि परिसरातील इतर शाळांना देखील या प्रदर्शनाचा फायदा घेता येईल. संपूर्ण दिवसभर हे प्रदर्शन खुले राहील, आणि संध्याकाळी ही बस नगरकडे रवाना होईल.