*समृद्ध किसान उत्सव कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे संपन्न*
*एकरी १०० टन ऊस उत्पादन शक्य - डॉ.सुरेश माने पाटील*
श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने व कृषी जागरण यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कृषि अनुसंधान परिषद स्थापना दिन व कृषि विज्ञान केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘समुद्ध किसान उत्सव’ कार्यक्रम दहिगाव-ने येथे संपन्न झाला. यावेळी डॉ.सुरेश माने, माजी शास्त्रज्ञ, व्ही.एस.आय.पुणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील हे होते.
दिनांक १६ जुलै हा दिवस भारतातील कृषि क्षेत्रातील सर्वोच्च संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा स्थापना दिवस म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने व कृषी जागरण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समुद्ध किसान उत्सव’ संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.सुरेश माने यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शाश्वत ऊस तंत्रज्ञान याबद्दल मार्गदर्शन केले. महाराष्ट्रामध्ये ऊस हे मुख्य नगदी पिक असून घटत चालेली उत्पादकता हि प्रमुख उत्पादकापुढील समस्या आहे. तर दुसरीकडे एकरी १०० टन किंवा त्यापेक्षाहि जास्त उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. योग्य हंगामात ऊस लागवड, आंतरपिके, लागवडीच्या सुधारित पद्धती, जमिनीची सुपिकता, योग्य पद्धतीने पूर्व मशागत व अंतर मशागती, खतांचा एकात्मिक वापर,चांगल्या बेण्याची निवड, कीड, रोग व तणांचे योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी १०० टनापेक्षा हि जास्त उत्पादन मिळू शकते असे डॉ.माने यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.डॉ. नरेंद्र घुले यांनी मार्गदर्शन करतांना शेतकऱ्यांना सन्मान व शेतीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे असे सांगितले. शेतकऱ्यासमोरील विविध अडचणी मांडत त्या सोडविण्यासाठी समुदायीक प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या भागातील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राकडील उपलब्ध असलेले तंत्रज्ञान व सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असा आग्रह धरला.
या कार्यक्रमाच्यावेळी केव्हीके चे शास्त्रज्ञ श्री माणिक लाखे, श्री नारायण निबे व डॉ.चंद्रशेखर गवळी यांनी विविध शेती व सलग्न विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने निवडक कृषि अधिकारी व शेतकऱ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कृषि क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. टी.एस.पी.प्रकल्पाअंतर्गत मागासवर्गीय महिला व पुरुषांना प्रात्यक्षिकासाठी विविध निविष्ठांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्यावेळी महिंद्रा ट्रॅक्टर, इसुझु व्हेईकल, जे.सी.बी., टाटा मोटर्स, धनुका अॅग्रो, एव्हरेस्ट रूफिंग व केव्हीके दहीगाव-ने यांचे उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले.
यावेळी मंचावर श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील, मा.आ.पांडुरंग अभंग, अॅड.देसाई देशमुख, काकासाहेब शिंदे, बबनराव भुसारी, अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते, सहसचिव रविंद्र मोटे, सुरेश आहेर उपविभागीय कृषि अधिकारी श्रीरामपूर अमोल काळे, तालुका कृषि अधिकारी अंकुश टकले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषि जागरण च्या वतीने प्रीयांषु सिह, आशिष गौर, महिंद्रा ट्रॅक्टर चे रामदास उकाले व अमरनाथ गुरुबेट्टी, धनुका अॅग्रोचे घनश्याम इंगळे, इसुझु व्हेईकल चे लक्ष्मन अंबावले, जे.सी.बी.चे विजय पवार व एव्हरेस्ट रूफिंगचे गणेश पवार तसेच केव्हीके चे शास्त्रज्ञ श्री.नंदकिशोर दहातोंडे, श्री.प्रकाश हिंगे व श्री. प्रकाश बहिरट इ. मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास एक हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजी.राहुल पाटील व नियोजन व आभार श्री.सचिन बडधे यांनी मानले.