ज्योती क्रांती मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये दरोडा



धाराशिव,: शहरातील बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट या पतसंस्थेवर पाच जणांनी दरोडा घातला. पिस्टल व चाकूचा धाक दाखवून या सर्वांनी जवळपास २ कोटी रुपयांचे सोने, रोकड पळविली. चेहऱ्यावर मास्क न लावता दरोडेखोरांनी हे कृत्य केले. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, श्री तुळजाभवानी क्रिडा संकुलाच्या जवळच असलेल्या सुनील प्लाझामध्ये ज्योती क्रांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही बँक आहे. या बँकेत दुपारच्या सुमारास पाच जण घुसले. त्यांची ही कृती सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यानुसार या सर्वांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर पिस्टल व चाकूचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले. त्यानंतर बँकेतील १ लाख ४० हजार रुपयांची रोकड तसेच जवळपास १ कोटी ८७ लाख रुपये किमतीचे सोने, २ मोबाईल पळवून नेले. ही घटना घडल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उस्मान शेख यांना याबाबतची माहिती कळविली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी येथे दाखल झाले. श्वानपथक, ठसेतज्ञ यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी तपास करत आहेत. समता नगर पर्यंत श्वानाने माग काढला. दरोडेखोर बँकेत घुसले तेव्हा बँकेत केवळ दोनच कर्मचारी होते. कॅशिअर सतीश अनिरुद्ध फुटाणे यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याची नोंद आनंद नगर पोलिस ठाण्यात झाली आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे तपास करत आहेत.
दरम्यान, लुटीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गुन्हेगारांनी तोंडावर मास्क न लावता हा दरोडा घातला. त्यामुळे त्यांचा माग काढणे पोलिसांना सुकर होणार आहे. याबाबत कोणाकडे आणखी सीसीटीव्ही फुटेज असल्यास किंवा या दरोडेखोरांना ओळखत असल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.