नैसर्गिक आपत्ती निधी खात्याचे लेखापरीक्षण करणार
नेवासा तहसीलदारांच्या आश्वासनानंतर 'आप'चे उपोषण मागे : महाघोटाळा उघड होण्याचा आंदोलकांचा दावा
नेवासा (प्रतिनिधी) - नैसर्गिक आपत्ती निधी खात्याचे सुरुवातीपासून लेखा परिक्षण करण्याचा प्रस्ताव वरीष्ठांकडे पाठविण्याचे लेखी आश्वासन नेवासा तहसीलदार संजय बिरादार यांनी दिल्यानंतर आम आदमी पार्टीने सुरु केलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे. या खात्याचे लेखापरिक्षण झाल्यानंतर महाघोटाळा उघडकीस येण्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
नेवासा तहसील कार्यालयांतर्गत नैसर्गिक आपत्ती निधी खात्यात लाखो रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा गैरप्रकार मागील वर्षी उघडकीस येऊन याप्रकरणी तत्कालीन तहसीलदारांच्या फिर्यादीवरुन काही व्यक्तींवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून मोठा कालावधी उलटून गेल्यानंतरही या समितीने चौकशीस टाळाटाळ केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी तत्कालीन तहसीलदारांची भुमिका नेहमीच संदिग्ध राहिल्याचाही आरोप आहे. शासकीय स्तरावरील या निधीचे तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेत वरीष्ठांच्या परवानगीने एकच खाते उघडण्याचे प्रयोजन असताना प्रत्यक्षात या निधीचे महाराष्ट्र बँकेच्या नेवासा शाखेत दोन तर आयसीआयसीआय बँकेच्या श्रीरामपूर शाखेत एक खाते उघडण्याच्या उद्देश्याबाबत संशय आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या तालुक्यातील लाभार्थ्यांना चेकद्वारे मदतीची रक्कम अदा करणे अपेक्षीत असताना बहुतांश लाभार्थ्यांना ती आरटीजीएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आल्याकडे त्यांनी याद्वारे लक्ष वेधले आहे. एकाच निधीची दोन बँकांत तीन खाती तसेच आरटीजीएस प्रणालीद्वारे मदतीची रक्कम वितरित करण्याच्या संबंधितांच्या अट्टाहासाबद्दल नेवासा तालुका आम आदमी पार्टीने संशय व्यक्त करत उच्चस्तरिय सखोल चौकशीची मागणी केली. 2012 पासून अस्तित्वात आलेल्या या खात्यात शासकीय स्तरावरुन तीन अब्ज रुपयांवर रक्कम जमा होऊन खर्चही झालेली असल्यामुळे तत्कालीन तहसीलदारांनी त्यांच्या फिर्यादीत नोंदलेल्या 16 लाख रुपयांपेक्षा कितीतरी अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप 'आप'च्या वतीने करण्यात आला. तत्कालीन तहसीलदारांनी त्यांच्या फिर्यादीत नमूद केलेल्या आरोपींच्या बँक खाते उताऱ्यांवरुन आरोपींच्या खात्यावर नैसर्गिक आपत्ती निधी खात्यातून जमा झालेल्या बऱ्याचशा मोठाल्या रकमांकडे तहसीलदारांच्या फिर्यादित सोयिस्कर दुर्लक्ष करण्यात आल्याच्या धक्कादायक वास्तवाकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रत्यक्षात या घोटाळ्याची व्याप्ती कोट्यावधी रुपयांची असताना तत्कालीन तहसीलदारांसह सर्व संबंधितांनी तो अवघ्या काही लाखांवर दर्शवून एकप्रकारे तो दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप 'आप'च्या वतीने करण्यात आला होता. मात्र प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने नेवासा 'आप'चे राजु आघाव, अॅड.सादिक शिलेदार, प्रवीण तिरोडकर, संदीप आलवणे, किरण भालेराव, विठ्ठल मैंदाड, अण्णासहेब लोंढे, विठ्ठल चांडे आदींनी पूर्वसूचना दिल्यानुसार दि.1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तहसीलसमोर आमरण उपोषण सुरु केले होते. नेवासा तहसीलदार संजय बिरादार यांनी आंदोलकांची भेट घेऊन नैसर्गिक आपत्ती निधी खात्याचे नियमानुसार वैधानिक लेखापरिक्षण करुन 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' करण्याची संकल्पना मांडली.
चौकट -
सब गोलमाल है -
नैसर्गिक आपत्ती निधीचे राष्ट्रीयकृत बँकेच्या स्थानिक शाखेत वरीष्ठांच्या परवानगीने केवळ एकच खाते उघडण्याचा नियम असताना संबंधितांनी महाराष्ट्र बँकेच्या नेवासा शाखेत दोन तर श्रीरामपूर येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत एक खाते उघडण्याचा अट्टाहास केल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. निष्पन्न झालेल्या आरोपींच्या बँक खाते उताऱ्यांवर या निधीतून मोठाल्या रकमा वेळोवेळी वर्ग करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत असताना त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केल्याच्या वास्तवाकडे आंदोलकांनी लक्ष वेधले आहे. अपहाराचा गुन्हा उघड झाल्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीला चौकशीसाठी वर्षभरानंतरही मुहूर्त मिळाला नाही, हे विशेषच!