नगर :
केडगाव उपनगर परिसरातील बाह्यवळण रस्त्यावर काल (गुरुवारी) रात्री गोळीबार झाला. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
केडगाव बाह्यवळण रस्ता परिसरात काल रात्री साडेदहा वाजता एका हॉटेलमध्ये बसलेल्या दोन जणांवर तीन अज्ञात व्यक्तींनी लूट करण्यासाठी गोळीबार केला. यात शिवाजी किसन होले (रा. कल्याण रस्ता, अहमदनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अरुण नाथा शिंदे (रा. नेप्ती, ता. नगर) हे जखमी झाले.
शिंदे यांच्या कडील सात हजार रुपये हल्लेखोरांनी नेले. ही माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके पाठविण्यात आली आहेत.