पोलीस उपअधीक्षक संतोष खाडेंच्या तत्परतेने चोरट्याला चांगलीच अद्दल!नेवासा बसस्थानकात बॅग चोरण्याचा प्रयत्न फसला; नागरिकांचा सजगपणा आणि पोलिसांची तत्काळ कारवाई

पोलीस उपअधीक्षक संतोष खाडेंच्या तत्परतेने चोरट्याला चांगलीच अद्दल!
नेवासा बसस्थानकात बॅग चोरण्याचा प्रयत्न फसला; नागरिकांचा सजगपणा आणि पोलिसांची तत्काळ कारवाई

नेवासा, दि. १० (प्रतिनिधी) – छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जाणारी एस.टी. महामंडळाची बस शनिवारी (दि. १०) सायंकाळी ५ वाजता नेवासा बसस्थानकात दाखल झाली असता, बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने दुसऱ्याच्या बॅगेवर डोळा ठेवून ती उचलून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या तातडीच्या कारवाईमुळे चोरट्याचा डाव फसला.

या घटनेत शिर्डीकडे जाणाऱ्या एका जोडप्याची बॅग चोरट्याने चोरून पळवण्याचा प्रयत्न केला. जोडप्याने आरडाओरड केल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ पाठलाग करून संबंधित आरोपीला पकडले आणि चांगलाच चोप दिला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, पोलिसांनी चोरट्याची नेवासा बसस्थानकापासून पोलीस ठाण्यापर्यंत पायी धिंड काढली, ज्यामुळे परिसरात प्रचंड गर्दी जमली होती.

संबंधित आरोपी एका नामांकित कंपनीत कामाला होता. मात्र नोकरी गेल्यानंतर मानसिक तणावाखाली त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले. या प्रकारात फिर्याददाराने पोलीस ठाण्यात तक्रार न दाखल करता, पोलीसांनी स्वतःहून कारवाई करत आरोपीला चांगलीच अद्दल घडविली.

या घटनेमुळे नेवासा शहरात चांगलीच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये पोलिसांच्या तातडीच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांची कार्यक्षमता आणि तत्परता यांचे विशेष कौतुक होत आहे.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.