खेसमाळसकर हे शिक्षक नव्हे तर युगपुरुष; शिस्त, नवोपक्रमांचा आदर्श ठसा!” – रामनाथ रुईकर



“खेसमाळसकर हे शिक्षक नव्हे तर युगपुरुष; शिस्त, नवोपक्रमांचा आदर्श ठसा!” – रामनाथ रुईकर

खरवंडी (प्रतिनिधी विशाल कु-हे) – “शिस्त, संस्कार, शिक्षण आणि सतत नवोपक्रमांची उर्मी यांचा मूर्तिमंत संगम म्हणजे भाऊसाहेब बी. आर. खेसमाळसकर. ते केवळ शिक्षक नव्हते, तर एका पिढीचे प्रेरणास्थान होते,” अशा शब्दांत शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक रामनाथ रुईकर यांनी खेसमाळसकर सरांच्या कार्याचा गौरव केला.

भाऊसाहेब खेसमाळसकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. १९९३ साली शिक्षक म्हणून कार्यारंभ करून, २००० ते २०२५ या कालखंडात मुख्याध्यापक पदाची जबाबदारी त्यांनी लीलया सांभाळली. तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी आपल्या कार्यातून शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला.

 शाळा उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षण साधनांचा वापर, परिसर स्वच्छता अभियान, पालक सहभाग योजना असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांच्या कार्यकाळात यशस्वीपणे राबवण्यात आले. 

याचबरोबर १९९५ ते २००० दरम्यान गावचे सरपंच म्हणूनही त्यांनी नेतृत्व करत सामाजिक विकासाची नवी दिशा ठरवली. पाणी योजना, रस्ते, ग्रामस्वच्छता या बाबतीत त्यांचे योगदान लक्षवेधी ठरले.

कार्यक्रमास संजय कल्हापुरे, राजेंद्र झीने, कारभारी लोणारी, भरत मुळे, रामनाथ सकट, अनिल दरंदले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावाने एका शिक्षकाच्या रूपाने जणू एक युग अनुभवले आणि आज त्यांच्या सेवानिवृत्तीने एक अध्याय संपला असला, तरी त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना दिशा देत राहणार, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.