चिलीमद्वारे गांजाचे सेवन करताना वयोवृद्ध इसम पोलिसांच्या जाळ्यात; NDPS अंतर्गत कारवाई
राहुरी (ता. प्रतिनिधी): राहुरी शहरातील भाजी मंडई परिसरात चिलीमद्वारे गांजाचे सेवन करत असलेल्या एका 73 वर्षीय इसमावर राहुरी पोलिसांनी NDPS कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. ही घटना मंगळवारी, दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.
पोलिस नाईक नदीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक फौजदार गिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचासह कारवाई करत भाजी मंडईजवळील मुक्ताई मंदिर परिसरात रमेश दामोधर जगधने (वय 73, रा. लक्ष्मीनगर, राहुरी) या इसमास चिलीमद्वारे गांजाचे सेवन करताना रंगेहाथ पकडले. इसमाची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे चिलीम, काडेपेटी व गांजाचे अंश आढळून आले.
सदर साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले असून, इसमास वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय राहुरी येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार इसमाने गांजाचे सेवन केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी रमेश जगधने याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (क) सह 27 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.