दर्श अमावास्येनिमित्त शनिशिंगणापूर येथे यात्रा नियोजन बैठक संपन्न
सोनई, दि. २८ (सा. वा.) – दर्श अमावास्येनिमित्त शनिवारी (दि. ३०) श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे यात्रा भरवली जाणार आहे. यासाठी विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिशिंगणापूर येथे यात्रा नियोजन बैठक पार पडली. वाढती गर्दी लक्षात घेता, यात्रेची व्यवस्था उत्तम रितीने केली जाणार असल्याची माहिती देवस्थान विश्वस्त मंडळ आणि शासकीय अधिकाऱ्यांनी दिली.
यात्रेला ३० नोव्हेंबर सकाळी ११ पासून प्रारंभ होईल. यावेळी, अर्धी अमावास्या असली तरी मंदिर परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने, व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना घेतल्या जात आहेत. बैठकीत पोलीस प्रशासन, पाणीपुरवठा, आरोग्य, विद्युत, एसटी महामंडळ आणि देवस्थान सुरक्षा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नगर-संभाजीनगर महामार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी आदित्य लॉज जवळ वाहनतळ उभारला जाणार आहे. तसेच पुणे-नगरमार्गे येणाऱ्या वाहने शनेश्वर ग्रामीण रुग्णालय वाहनतळावर पार्क होतील, तर शिर्डी-राहुरीमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी मुळा साखर कारखान्याच्या साइटवर वाहनतळ उपलब्ध करावण्यात येईल.
अमावास्येनिमित्त यात्रा भरवली जात असल्याने किमान तीन ते चार लाख भाविकांची गर्दी होण्याची अपेक्षा आहे. यावेळी नेवासा येथील नायब तहसीलदार बोरुडे, शनिशिंगणापूरचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, शनेश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्ष दरंदले, सहायक अधिकारी नितीन शेटे, आप्पा शेटे, दादासाहेब बोरुडे आणि तलाठी पवार यांसह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
यात्रा नियोजनासाठी केलेल्या या बैठकीचे आयोजन भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधा वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे.