Ahmednagar Lok Sabha: अहमदनगरमध्ये विखेंविरुद्ध लंके? धनश्री विखे, राणी लंकेंची राजकीय कार्यक्रमात वाढती हजेरी, अहमदनगरचा किल्लेदार कोण?

Lok Sabha Election 2024, Ahmednagar : अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) तारखा या कधीही जाहीर होतील. पण अशातच एका मतदार संघाचीसुद्धा चांगलीच चर्चा आहे. खासदार सुजय विखे (MP Sujay Vikhe) पाटील विरुद्ध आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) दोन्ही गटाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतंय.
विशेष म्हणजे, या दोन्ही कार्यक्रमात निलेश लंकेंच्या पत्नी देखील सक्रिय होताना दिसत आहेत. तसेच, खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखेही (Dhanashree Vikhe) प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन महिला वर्गाला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके (Rani Lanke) यांनी देखील शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा क्षेत्र पिंजून काढत आहेत. 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सध्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार? याबाबत स्पष्टता आलेली नाही. कधी राष्ट्रवादीचे कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नावाची चर्चा होते, तर कधी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नावाची चर्चा होत असते. मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम देत आमच्या दोघांपैकी कोणीही उमेदवार नसेल, लवकरच उमेदवार कोण असेल याची गोड बातमी देऊ, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. 
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढत 
अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा भाजप आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यानं या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळते. मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानं या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद विभागली आहे. त्यातच अद्याप राष्ट्रवादीनं आपला उमेदवार जाहीर केलेला नाही किंवा कोणत्याही इच्छुक उमेदवाराकडून तयारी सुरू झालेली नाही. त्यामुळे भाजप खासदार सुजय विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादीत कोण उमेदवार असणार याची आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे. 
सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होणार? 
महायुतीत एकत्रित असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात आणि विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यात राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आमदार निलेश लंके यांच्या नावाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर निलेश लंके हे अजित पवार गटांमध्ये सहभागी होत महायुतीमध्ये सत्तेत आले. तर दुसरीकडे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके (Rani Lanke) यांच्याकडून वारंवार आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य केलं जात आहे. तर आमदार निलेश लंके यांच्याकडूनही एका घरात दोन मतप्रवाह असू शकतात, असं म्हणून एक प्रकारे राणी लंके यांच्या वक्तव्यांचं समर्थन देखील केलं जातं.  
भविष्यात आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटात सहभागी होऊन डॉ. सुजय विखे पाटील यांच्याविरोधात दक्षिण नगर लोकसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा मतदारसंघात आहे. जर आमदार निलेश लंके यांनी आपल्या पत्नी राणी लंके यांना लोकसभेच्या मैदानात उतरल्या तर डॉ. सुजय विखे यांची पत्नी धनश्री विखे किंवा आई शालिनी विखे यांच्या देखील नावाची चर्चा सुरू आहे. त्यातच भाजप खासदार सुजय विखे यांना पक्षांतर्गत विरोधाला देखील सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. 
महत्त्वाच्या इतर बातम्या : 
Ahmednagar South Lok Sabha Constituency : अहमदनगर दक्षिण लोकसभा यंदा पुन्हा गाजणार, सुजय विखे यांच्याविरुद्ध कोण कोण लढणार?

                                                                                
            अधिक पाहा..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.