*विक्रम राठोड यांच्या भावाला जिवे मारण्याची धमकी*
अहमदनगर
नगर शहरात जीवघेण्या हल्लांचे सत्र सुरू आहे. अशातच काल (मंगळवारी) सायंकाळी ७.३० वाजता शिवसेनेचे युवा नेते विक्रम राठोड यांच्या चुलत भावाच्या डोक्यावर पिस्तुल ठेवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी काही तासांतच जेरबंद केले. या घटने संदर्भात आदित्य राठोड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आदित्य संजय राठोड (वय २५, रा. नेता सुभाष चौक, तोफखाना, नगर) हे त्यांच्या पत्नी प्रिशा राठोड यांच्यासह पुण्यातून नगरला कारने येत होते. त्यांची कार कायनेटिक चौकात आली असता मागून आलेल्या लाल रंगाच्या कारने ओव्हरटेक केले. ही कार राठोड यांच्या कारला अडवी उभी राहिली. त्यातील दोन व्यक्ती खाली उतरले त्यांनी राठोड यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच डोक्यावर पिस्तुल लावून येथून कारमध्ये बसून निघून जा, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, असे फिर्यादीत म्हणण्यात आले आहे.