तरूणाला मारहाण, घरात घुसून पत्नीसोबत गैरवर्तन
चौघांवर तोफखाना पोलिसात गुन्हा
अहमदनगर (प्रतिनिधी) भावाला मारहाण केल्याचा जाब
विचारण्यासाठी गेलेल्या तरूणाला चौघांनी मारहाण केली. तसेच घरात घुसून पत्नीसोबत गैरवर्तन केल्याची घटना सोमवारी (दि.१०) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नालेगाव परिसरात घडली.या प्रकरणी तरूणाने मंगळवारी (दि. ११) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.करण सुरेश वाणी, धीरज राजु वाणी, विकी राजु वाणी व सोनु राजु वाणी (सर्व रा. नालेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादीच्या भावाचे करण वाणी सोबत वाद झाले होते.करण याने फिर्यादीच्या भावाला मारहाण केली होती. याचा जाब
विचारण्यासाठी फिर्यादी करण याच्याकडे गेले असता त्याने दगड फेकून मारत लोखंडी टनक वस्तूने डोक्यात मारून जखमी केले. तेथे आलेले धीरज, विकी व सोनु यांनी देखील मारहाण केली. फिर्यादी घाबरून घरात पळाले असता मारहाण करणारे चौघे त्यांच्या घरात
घुसले. त्यांनी घरातील खुर्ची तोडून नुकसान केले. फिर्यादीची पत्नी मध्ये आली असता करण याने त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.